June 22, 2015

Harishchandragad Trek - साक्षात्कारी हरिश्चंद्रगड

हरीश्चंद्राच्या वाऱ्या तशा आधीही झाल्यात, कधी खिरेश्वर तर कधी पाचनयी वरून. प्रत्येक वेळी त्याच सौंदर्य मनाला भारून टाकणारंपावसानं चिंब भिजलेल्या काळ्या पाषाणाचं मंदिरओलेत्या अंगानं आणि शेवाळाच्या संगतीने निळ्याशार आकाशाच्या background वर खरंच खूप सुंदर दिसतं. हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यात, धुक्यात हरवलेलं मंदिर शोधताना खरी गंमत  अनुभवायला मिळते.
 पण एव्हडं असूनही कोकणकडा आणि तिथून दिसणारा नजारा नजरेत साठवता आला नव्हता कधी. कधी कोकणकडा ओलेत्या अंगाने ढगांची चादर पांघरून बसलेला, तर कधी कडाक्याच्या थंडीत धुक्याची दुलई घेवून निजलेला पाहिलाय मी. पावसाळ्यात  सरींना सोबत घेवून येणारा आद्र वारा आणि थंडीत गारठवणाऱ्या धुक्यातला लपंडाव, हे सारं एकदा तरी अनुभवणं म्हणजेच  माझ्या लेखी स्वर्ग.

पण कशी कोणजाणे अचानक खुमखुमी आली, मित्रांच्या "हो" ला "हो" करताना परत एकदा केदारेश्वराच्या दर्शनाचा योग जुळून आला. रस्ताही ठरला "नळीची वाट".  पावसाळा तोंडावर आलेला, येणारा वीकेंड सोडला कि मग दिवाळी पर्यंत किंवा पुढच्या उन्हाळ्या पर्यंत वाट बघण्या शिवाय पर्याय नव्हता. मग काय निघालो हरिश्चन्द्रेश्वरच्या आणि केदारेश्वराच्या दर्शनाच्या ओढीनं. तसा नळीच्या वाटेचा अनुभव कुणालाच नव्हता.
हरिश्चंद्रगड म्हणजे महाराष्ट्रातला एक बेलाग आणि रुद्र सुंदर गड आहे. भैरवगड, जीवधन, चावंडगड, हडसर, शिवनेरी अशी एक साखळी हरिश्चंद्राशी जोडलेली आहे.

हरिश्चंद्र नावाच्या राजामुळे गडाला हरिश्चंद्रगड असे नाव मिळाले. पूर्वीच्या संपूर्ण भारतात हे ठीकाण प्रसिद्ध होते. योगी आणि हटयोगी, धर्मोपासक गडावर वास्तव्याला होते. येथेच हरिश्चंद्राचे शिवालय आहे, येथूनच प्रवरेची भगीनी "मुळा" नदीचा उगम सांगितला जातो. गडावर प्रचंड मोठ्या गुहा खोदलेल्या आहेत. विश्वामित्रांचा निवास येथेच असावा असे बोलले जाते. तारामती रोहिदास यांचे डोंगर / शिखरे येथे आहेत. मध्य काळामध्ये चांगदेवांचे निवासस्थान येथे होते. याच गडावर चांगा वटेश्वरांच्या "तत्वसार" ग्रंथाची निर्मिती झाली. नाथ सांप्रदायाचा उगम हि येथूनच झाला.

दहाव्या, अकराव्या शतकात या गडाची महती सर्वदूर पसरलेली होती, काशीमधे गंगेकाठी काशीतल्या पुरातन मंदिराशेजारी हरिश्चन्द्रेश्वराचे मंदिर आहे. मत्स्यपुराणात हि हरिश्चंद्राचा उल्लेख "सह्याद्रावेकवीरा तु  हरिश्चंद्रे तु चंद्रिका" असा आहे. शक्तीच्या कशेआठ स्थानांमध्ये या गडाचा सामावेश होतो.
म्हणूनच हरीश्चंद्रगड आणि हरिश्चंद्रेश्वर माझ्यासाठी एक अधिष्ठान आहे, ज्याच्या चरणी नेहमीच नतमस्तक व्हाव असं. नळीच्या वाटेवर खरोखरंच मला साक्षात्कार झाला असा वाटावा असा काही अनुभव आला. काही गोष्टींसाठी खरतर काही कारण लागत नाही आणि काही गोष्टी काही कारण असल्याशिवाय घडतही नहित, त्या घडण्यासाठी, समजण्यासाठी कींवा दृष्टांतासाठी म्हणा, खर तर एखाद्या कठीण प्रसंगाची आवश्यकता असते. त्या प्रसंगा शिवाय खुपसार्या गोष्टी या अनाकलनीय असतात. जगण्यासाठी चाललेला अट्टाहास हा खरंच  मोहमाया आहे हे समजावून गेला मला हरिश्चंद्रगड.

काही मित्र नेहमी म्हणतात सुखाचा जीव धोक्यात घालून काय मिळवतोस? पण मी जे मिळवतो ते शब्दांच्याही पलीकडले आणि समजावता येणारे आहे.

नळीचा एक एक टप्पा ओलांडत होतो, नवीन टप्पा अधिकाधिक कठीणसोबतीला  मित्र होते पण कुणालाच अंदाज नव्हता नळीच्या दुर्गमतेचा. प्रत्तेक पावसाळ्या गणीक वाट आणखी दुर्गम होत जाते हे ऐकलेलं होतं त्याचा अनुभव येत होता. आधी दगडांच्या भिंती चढून जाऊन मग सामान दोरीच्या सहाय्याने खेचून घ्यावे लागत होते. जसे जसे अंतर पार करत होतो तशी जाणीव होत होती कि परत फिरावा लागला तर ते किती कठीण आहे याची. अभिजीत तर खरंच भेदरला होता त्याचा हा पहिलाच अनुभव आणि तोही कठीण, पण मला आणि मच्छिंद्र दादांना शाश्वति होती कि आम्ही नक्की वर पोहोचणार. मधेच एका चुकीच्या रस्त्याने आमचा दोन तासांचा वेळ वायागेला, भरीसभर म्हणजे माझा पायही दुखावला.



आता चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तरीही मच्छिंद्र दादा आणि विजय पुढे निघाले होते, अभिजीत आणि रुपेश माझ्या मागे होते. वर चढणाऱ्याच्या पायाने दगड निसटून खाली दरीत पडत होते, त्या मुळे सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही एकमेकांमध्ये थोड अंतर ठेवून चढत होतो. आधीच्याने सांगितल्या शिवाय खालचा चढायला सुरुवात करायचा नाही. एकदा विजय दगड डोक्यात पडताना नशिबाने वाचला होता आणि मी अशाच एका दगडाने पाय दुखावून घेतला होता. खरंच एखाद्या वाटाड्याची गरज होती, पण ठीक आहे आता नाहीये तरी काही बिघडत नाही.



पुढे गेलेले विजय आणि दादा दोघेही थांबलेले दिसले, अस्सल ठेवणीतला शब्द उच्चारून विजयला थांबण्याच कारण विचारल, तर त्याचा चेहरा सगळा काही सांगून गेला. करणार तरी काय? कोणा कडेच उत्तर नव्हतं. एका अरुंद घळी मध्ये आम्ही पोहोचलो होतो, सपाटीची जागाच नव्हती, सगळी उभी मुरमाड चढण, पाय ठेवायलाही अवघड. प्रत्तेक जन एखाद्या कापारीचा आसरा घेवून जेमतेम उभे होतो, कधी त्या सरळ चढणीवर पायाखालचा मुरूम सरकेल याचा नेम नव्हता. विजय जिथे पोहोचला होता तिथेच घळ संपत होती. समोर सरळसोट कडा, दोन्ही बाजूंना उंच मुरमाड दगडाच्या भिंती, पण उजव्या बाजूच्या भिंतीवर २०/२५ फुटावर मार्ग दाखवणारी निळ्या रंगाची खूण होती त्या मुळे मार्ग नक्की होता, ती २०/२५ फुटाची भिंत पार करून वर चढाव लागणार होता. तो कडा फुसक्या दगडांनी बनलेला होता त्यामुळे सरळ चढणंही जीवघेणा होता. वर पडणारे दगड आणि खाली सरळ खोल दरी, वरून बघितला तरी डोळे फिरायचे. पडलो  तर कपाळमोक्ष ठरलेला, शोधायला सुद्धा कुणी खाली उतरणार नाही याची शाश्वती. आता चढणार तरी कसा ?, आधारा साठी हात ठेवला तरी दगडांची रास पडणार. थोड्या वेळा साठी आयुष्यातले सर्व सखे आप्तेष्ट डोळ्यासमोर येउन गेले.
दोनच मार्ग शिल्लक, एक तर तिथे थांबून परतीला, आल्या मार्गी फिरणं किंवा जीव धोक्यात घालून सरळ ती भिंत चढणं. पहिला मार्गहि कठीण कारण जेमतेम २ लीटर पाणी शिल्लक राहिलेल, चढण्या पेक्षा उभ्या  दगडांच्या भिंती उतरणं कठीण. चढताना आधार शोधायला डोळे हाता जवळ असतात, पण उतरताना पायाचा आधार शोधणं म्हणजे फक्त "तांदळामाजी खडे शोधण्या" इथपत कठीण.
जणूकाही मरणाच्या उंबरठ्यावर होतो, इथेच मला आयुष्याच्या फोलपणाची जाणीव झाली. तो कडा चढणं म्हणजे मरणाला आमंत्रण देणं, पण त्या १५ मिनिटांच्या चढणी नंतर मला रस्ता दिसत होता. मनाशी काही एक निर्धार करून उठलो, पायातले बूट काढून अभिजीत कडे दिले. चढायला सुरुवात करणार आव्हड्यात, दादा आणि विजयने मला कमरेला दोर बांधण्याचा सल्ला दिला जेणेकरून दुसरे टोक त्यांच्या हातात राहील आणि पडलो तरी खाली दरी मधे पडताना बुडत्याला काठीचा आधार मिळेल. सर्वानुमते ठरला कि घळीच्या टोकावरून सरळ पुढे २० फुट चढत नंतर आडवा २०/२५ फुट अंतर  चढायचं, जेणे करून दगड सरळ अंगावर येणार नाहीत. देवाचा नाव घेवून चढायला सुरुवात केली, पहिल पाऊल ठेवला तिथले दगड माती घळी मध्ये ढसाळली आणि मला माझ मरण दिसले, थोडक्यात वाचलो कारण माझे हात अजून घट्ट आधारावर होते. आता चांगलाच धडा घेतला होता, जो पर्यंत पक्का आधार मिळत नाही तो पर्यंत आधीचा पाय उचलायचा नाही. आता मी हाताने पुढचे निसटते दगड काढून पाय आणि हातासाठी जागा तयार करत होतो. एक दगड खाली फेकल्यावर खाली घळीत उभ्या रुपेश वर नजर गेली आणि त्याला बाजूला व्हायला सांगितला. आता अशा जागेवर उभा होतो कि पायाखालचे दोन्ही दगड तकलादू निघाले, आता सर्व मदार हातावर. दोन्ही हातावर संपूर्ण वजन घेवून पुढे लोम्बकळलो, माझ्या नशिबाने मला उंबराच्या झाडा खाली दगडाची खोबण दिसली.

१५ मिनिटांच्या प्रयत्ना मध्ये मी कडा चढून तिथल्या कपारीत जाऊन बसलो. समोर चढण संपल्यावर उंबराचं छोटं झाड आहे, त्याच्या मुळाला दोर बांधून बाकीच्यांनी मग वर सरकायचा असा आमचा बेत होता. सर्व जन त्या उंबराच्या झाडाचे आभार मनात दोरीच्या सहाय्याने कडा चढून वर आले. ते उंबराचं छोटं झाड आमच्यासाठी देवदूत होतं.

या १५ मिनिटांच्या वेळेने मला जगाकडे बघण्याची नवा द्रुष्टीकोन दिला. खरंच मरणाशिवाय काहीही भीतीदायक नाही आयुष्यात. भीती हि माझ्या बॉस च्या रागावण्यात नाही, नोकरी सुटण्यात नाही. ह्या सर्व फारच शुल्लक गोष्टी आहेत. नोकरी, कॅरिअर, पैसा यांना आपण उगाचच फार मोठा करून ठेवलं आहे. माझा क्लायंट, माझा बॉस यांची मर्जी फिरली तर माझं कसा होईल?, याची आपल्याला भीती वाटते, खरंच हे सर्व भीतीदायक आहे का?. आपण या सर्व प्रश्नांसाठी आपली रात्रीची झोप उडवतो, सतत चिंतेमध्ये वावरतो, आपल्या बरोबर आपल्या घरच्यांना, मित्रांना, सोबत काम करणाऱ्यांना सर्वांनाच अजाणतेपणी त्रास देत असतो, या गोष्टी आपल्या अनमोल आयुष्यामधे/ सुखामध्ये माती कालवण्याच्या लायकीच्या आहेत. याचं उत्तर ज्यानेत्याने सोडवावं, मला मात्र माझ्या परीने उत्तर मिळालं.
आपण आपल्या बरोबर आपल्या पुढच्या पिढ्यांचीही सोय करण्यात एव्हडं हरवत गेलो आहे कि वर्तमानातला आनंद वाळूसारखा आपल्या हातातून निसटत चालला आहे. जणू काही आपण अमर्त्य जन्मलो आहोत आणि एकदा पैसे कमावल्यावर आपल्याकडे भरपूर वेळ आहे पैसे खर्च करण्यासाठी. लहान मुलाला आपल्या मुठीतल्या chocolate/गोळीच किती अप्रूप असतं, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण लाख रुपये मिळवले तरी आपल्या चेहऱ्यावर येवू शकत नाही या पेक्षा या सगळ्याचा फोलपणा काय असू शकतो. लाखो/करोडोचा आनंद, समाधान मी हरवून बसलोय.
हरीश्चन्द्रगडा वरचा तो खानावळवाला भास्कर, किती श्रीमंत आहे. ज्या ठिकाणी जाण्यासाठी माझ्या सारख्यांना वर्षभर वाट बघावी लागते, सुट्टीसाठी वरिष्टांची मर्जी झेलावी लागते. सुट्ट्या जमवण्यासाठी रात्रीचे दिवस करावे लागतात, परत आपल्याच सुट्ट्या मिळवण्यासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागतात, तिथं हा भास्कर आपल्या कुटुंबासहित सदासर्वकाळ राहतो, आता सांगा खरा श्रीमंत कोण आहे? आपण जे अहोरात्र कुणा दुसऱ्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून राबणारे, सकाळची :०० ची वेळ चुकू  नये म्हणून ट्रेन चे धक्के, लोकांच्या शिव्या पचवणारे. ज्याच त्याने ठरवायचं आहे.

रात्रीचे वाजले होते, आम्ही गड उतरायला सुरुवात केली वाघाच्या शिल्पाजवळ आणि दगडा जवळ पोहोचे पर्यंत अंधार पडला होता. मस्त काजव्यांच्या संगतीत  आम्ही गड उतरत होतो. कारण आमची गाडी खिरेश्वरला आमची वाट बघत होती.

1 comment:

गुदगुल्या said...

खूपच रोमांचकारी.. जगण्याकडे बघायचा दृष्टीकोन बदललास मित्रा.. धन्यवाद